रावेर प्रतिनिधी :
रावेर तालुक्यातील शिंदखेडा येथून गाय चोरी केल्याप्रकरणी रावेर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने तीन संशयित आरोपींना अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवून ही कारवाई केली. या घटनेमुळे परिसरातील पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
गोठ्यातून ४० हजारांची गाय चोरीला शिंदखेडा येथील संतोष देविदास पाटील (वय ४२) हे शेतीसोबत दुग्धव्यवसाय करतात. त्यांच्या घराशेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये दोन गायी आणि तीन म्हशी बांधलेल्या होत्या. दि. २८ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री गोठ्यातून गुरांचा आवाज आल्याने ते पाहण्यासाठी गेले असता, तपकिरी रंगाची व मोठी शिंगे असलेली गाय गोठ्यातून गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
सुमारे ४० हजार रुपये किमतीची ही गाय अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याप्रकरणी संतोष पाटील यांनी रावेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार दि. २९ ऑक्टोबर २०२६ रोजी गुन्हा रजिस्टर क्रमांक ४७९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२), ३२५ तसेच महाराष्ट्र प्राणी सुधारणा अधिनियम, १९९५ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा शोध गुन्हा दाखल होताच रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हे शोध पथकाला तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच गुप्त बातमीदारांच्या माध्यमातून माहिती संकलित केली. या तपासादरम्यान पोलिसांना संशयित आरोपींची ओळख पटविण्यात यश आले. या प्रकरणात पोलिसांनी खालील तीन आरोपींना ताब्यात घेतले :
१. शेख मुस्ताक शेख इसाक (वय ३८), रा. कुरेशी मोहल्ला, रसूलपूर, हल्ली मुक्काम मदिना कॉलनी, रावेर.
२. शेख अक्रम शेख असलम (वय २५), रा. जुनी नगरपालिका समोर, इमामवाडा, रावेर.
३. शेख समीर शेख कलीम (वय २६), रा. मदिना कॉलनी, रावेर.
पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान आरोपींनी गाय चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर तिघांनाही या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई ही कारवाई जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि फैजपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस कर्मचारी प्रमोद पाटील, विशाल पाटील, सुकेश तडवी, श्रीकांत चव्हाण, विकारोद्दीन शेख आणि योगेश पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सिकंदर तडवी करीत आहेत.
