पाल प्रतिनिधी अफजल खान
बनासकांठ्यातून थेट प्रक्षेपण; पालमध्ये शेतकऱ्यांनी अनुभवला पीएम किसान उत्सव! रब्बी हंगाम शेतकरी मेळाव्याला प्रतिसाद; आदिवासी उपयोजनेतून बियाणे व वर्मीबेडचे वितरण पाल, ता. रावेर : गुजरात राज्यातील बनासकांठा येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आयोजित पीएम किसान सन्मान निधीच्या २४ व्या हप्ता वितरण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण कृषी विज्ञान केंद्र, पाल येथे दाखविण्यात आले. परिसरातील शेतकरी व महिला शेतकऱ्यांनी या थेट प्रक्षेपणाला उपस्थित राहून पंतप्रधानांचा कार्यक्रम अनुभवला. यानिमित्ताने रब्बी हंगाम शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. तसेच आदिवासी उपयोजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बियाणे व वर्मीबेडचे वितरण करण्यात आले. सातपुडा विकास मंडळ संचालित कृषी विज्ञान केंद्र, पाल यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातपुडा विकास मंडळाचे अध्यक्ष अशोक झांबरे होते.
जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. महेश महाजन, तालुका कृषी मंडळ अधिकारी ललित इंगळे, नायब तहसीलदार गणेश साळी, डॉ. धीरज नेहते, प्रा. राकेश कापगते, भाग्यश्री चौधरी,सौरभ कूमार गडाख,अतूल महाजन,अकबर तडवी, मत्स्य विभागाचे अमोल गायकवाड, उपसरपंच ललिता पवार, सरपंच रतन बारेला, माजी जिल्हा परिषद सदस्य गोमती बारेला आदी उपस्थित होते. मेळाव्यात रब्बी हंगामातील पिकांचे नियोजन, पिकांवरील कीड व रोग नियंत्रण, कमी पाण्यात शेतीचे नियोजन, पशुधन संगोपन व चारा व्यवस्थापन तसेच दुष्काळी परिस्थितीत फळबागांचे व्यवस्थापन या विषयांवर तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करून कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्याचे आवाहन करण्यात आले. दरम्यान, आदिवासी उपयोजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीसाठी बियाणे व गांडूळ खत निर्मितीसाठी वर्मीबेडचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे आदिवासी भागातील शेतकऱ्यांना शेती उत्पादन वाढविण्यासह सेंद्रिय खत निर्मितीला प्रोत्साहन मिळणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध कृषी योजनांची माहिती, आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि पूरक व्यवसायांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

