*रावेर नगरपरिषद कंत्राटी कामगारांचे आर्थिक शोषण तसेच रावेर ग्रामिण रुग्णालय गर्भवती महिलांच्या आरोग्याच्या प्रश्नांवर निळे निशाण सामाजिक संघटनेचा आक्रमक पवित्रा* *एक नोव्हेंबर पर्यंत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश द्या; अन्यथा २ नोव्हेंबर रोजी आनंद बाविस्कर यांचा आत्मदहनाचा इशारा*

 


रावेर नगरपरिषदेतील कंत्राटी कामगारांचे ठेकेदाराकडून होत असलेले कथित आर्थिक शोषण तसेच रावेर ग्रामीण रुग्णालयात गर्भवती महिलांना भेडसावणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांकडे शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी निळे निशाण सामाजिक संघटनेचे संस्थापक तथा अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांनी रावेर तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा तिसरा दिवस उजाडूनही प्रशासनाने दखल घेतली नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

नगरपरिषदेतील कंत्राटी कामगारांचे आर्थिक शोषण थांबवून त्यांना शासनाच्या नियमानुसार वेतन मिळावे, तसेच या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

     या प्रकरणात काही अधिकारी आणि प्रभावशाली व्यक्ती ठेकेदाराची पाठराखण करीत असल्याचा संशय संघटनेने व्यक्त केला असून, संपूर्ण प्रकरणाची १ नोव्हेंबर २०२६ पर्यंत उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.

       दरम्यान, रावेर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या गर्भवती महिलांना आवश्यक वैद्यकीय सुविधा, योग्य औषधोपचार आणि वेळप्रसंगी शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशीही संघटनेच्या वतीने मागणी करण्यात आली  आहे .कामगारांचे आर्थिक शोषण आणि गर्भवती महिलांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांची तातडीने दखल घेऊन न्याय मिळवून द्यावा, अन्यथा शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आनंदभाऊ बाविस्कर यांनी २ नोव्हेंबर २०२६ रोजी रावेर तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

या गंभीर प्रकरणात प्रशासन आता कोणती भूमिका घेते आणि संबंधित मागण्यांवर काय कार्यवाही करते, याकडे रावेर तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.