पाल (प्रतिनिधी): अफजल खान
ग्रामीण व अतिदुर्गम भागातील जनतेचे प्रश्न थेट जागेवरच समजून घेण्यासाठी जळगावच्या माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी यावल तालुक्याच्या आदिवासी भागाचा धडक पाहणी दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी 'लंगडा आंबा' आणि जामन्या परिसरातील लोकसमस्या जाणून घेण्यावर विशेष भर दिला. त्यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी ऐकून घेतल्या आणि महसूल व इतर विभागांच्या विविध उपक्रमांना भेटी देऊन सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लोकसमस्यांचे निवारण केले.दौऱ्यादरम्यान, ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जामन्या येथे 'एक पेड माँ के नाम' या विशेष मोहिमेअंतर्गत निसर्ग संवर्धनाचा संदेश देत भव्य वृक्षारोपण करण्यात आले. माननीय जिल्हाधिकारी आणि नाशिक वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक श्री. कृष्णा भवर यांच्या शुभहस्ते येथे वृक्षलागवड करण्यात आले. वन्यजीव विभागाचे सहा. उपसंरक्षक निकत जामन्याचे सरपंच मोती जुगा पावरा ' यावल च्या तहसिलदार नाझीरकर युनुस तडवी जामन्या रेंजचे वनक्षेत्रपाल रूपेश दुसाने यांच्या सह सर्व अधिकाऱ्यांनी सकाळीच वनक्षेत्रात फिरस्ती करून वनसंवर्धनाच्या कामांचा प्रत्यक्ष आढावा घेतला.
या धडक दौऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांनी जामन्या येथील शासकीय आश्रमशाळा, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, 'नवसंजीवनी' स्वस्त धान्य दुकान, मालोद साझ्यातील तलाठी दप्तर आणि दुर्गम भागातील दळणवळणासाठी महत्त्वाच्या असलेल्या BSNL टॉवरच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित यंत्रणांना आवश्यक निर्देश दिले. जिल्हाधिकाऱ्यांच्या या थेट आणि संवेदनशील कामगिरीमुळे यावल तालुक्यातील ग्रामीण व आदिवासी जनतेतून अत्यंत समाधान व्यक्त होत आहे.

