रावेर प्रतिनिधी
आज दि.३० रावेर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री व्ही. एस. नाईक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विज्ञान विभागाचे ज्येष्ठ प्राध्यापक प्रा. डॉ. एस. जी. चिंचोरे सर आणि प्रा. व्ही. डी. पाटील सर यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित समारंभ अत्यंत भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
दोन्ही मान्यवर प्राध्यापकांनी तब्बल ३३ वर्षे विज्ञान शाखेतील गणीत आणी प्राणी प्राणीशास्त्र विभागात आपण अखंड, निष्ठावान आणि समर्पित सेवा बजावत महाविद्यालयाच्या शैक्षणिक परंपरेला समृद्ध केले. या प्रदीर्घ कालावधीत त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानदान करून त्यांच्या आयुष्याला योग्य दिशा दिली. विज्ञान विषयाची गोडी निर्माण करणे, विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती रुजवणे, गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे हे कार्य त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडले.
महाविद्यालयाच्या सुरुवातीच्या जडणघडणीपासून ते आजच्या प्रगत वाटचालीपर्यंतचा प्रवास त्यांनी जवळून अनुभवला आणि आपल्या कार्यातून त्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. विज्ञान विभागाची शैक्षणिक गुणवत्ता उंचावणे, प्रयोगशाळांचा विकास, विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन, विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे अशा अनेक क्षेत्रांत त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.
प्रा. डॉ. एस. जी. चिंचोरे सर आणि प्रा. व्ही. डी. पाटील सर हे केवळ प्राध्यापक नव्हते, तर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक, पालक आणि प्रेरणास्थान होते. त्यांच्या साधेपणा, शिस्तप्रियता, कर्तव्यनिष्ठा, वेळेचे नियोजन आणि विद्यार्थ्यांवरील प्रेमामुळे त्यांनी सर्वांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. त्यांच्या अध्यापनामुळे घडलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत उच्च पदांवर कार्यरत असून आपल्या यशाचे श्रेय आपल्या गुरूंना देतात, हीच त्यांच्या कार्याची खरी पावती आहे.
या प्रसंगी रावेर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे मा. अध्यक्ष हेमंतभाऊ नाईक यांच्या शुभहस्ते दोन्ही प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला. समारंभाला उपस्थित सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत कृतज्ञता व्यक्त केली.
३३ वर्षांचा हा प्रवास केवळ नोकरीचा नव्हता, तर ज्ञानदान, संस्कार, समर्पण आणि विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याच्या अखंड तपश्चर्येचा होता. अशा या दोन आदर्श शिक्षकांना महाविद्यालय परिवाराचा मानाचा मुजरा.
💐 प्रा. डॉ. एस. जी. चिंचोरे सर आणि प्रा. व्ही. डी. पाटील सर यांना सेवापूर्ती निमित्त हार्दिक शुभेच्छा! पुढील आयुष्य निरोगी, आनंदी, यशस्वी व समाधानमय जावो हीच सदिच्छा. 💐
"शिक्षक निवृत्त होतात, पण त्यांनी दिलेले ज्ञान, संस्कार आणि प्रेरणा कधीही निवृत्त होत नाहीत." डॉ उमेश पाटील✍️
