ऐनपूर प्रतिनिधी विजय अवसरमल
ऐनपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात अस्वच्छता व दुर्गंधीचे गंभीर वातावरण निर्माण झाले असून याचा थेट परिणाम रुग्णांच्या आरोग्यावर होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना दुर्गंधीमुळे त्रास सहन करावा लागत असून आरोग्य केंद्राच्या स्वच्छतेबाबत प्रशासनाचे दुर्लक्ष स्पष्टपणे दिसून येत आहे.
या प्रकाराकडे लक्ष वेधत भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शुभम पाटील यांनी आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. सार्वजनिक आरोग्य केंद्रात अशी अवस्था असणे अत्यंत दुर्दैवी असून तात्काळ स्वच्छता मोहीम राबवून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी ठाम मागणी त्यांनी केली.
“ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य हे शासनाचे प्राधान्य असले पाहिजे. प्राथमिक आरोग्य केंद्रातच स्वच्छतेचा अभाव असेल तर रुग्णांनी उपचारासाठी कुठे जावे?” असा सवाल शुभाम पाटील यांनी उपस्थित केला. संबंधित विभागाने त्वरित दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.
या घटनेमुळे ऐनपूर परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून आरोग्य प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

