*भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने भुसावळ तालुक्यात दहा दिवशीय महिला उपासक व समता सैनिक दल शिबिरांचे भव्य उद्घाटन*

*प्रतिनिधी भुसावळ, दि. १७ डिसेंबर २०२५*

भारतीय बौद्ध महासभा महिला व पुरुष विभागाच्या माध्यमातून भुसावळ शहर व परिसरात एकूण आठ ठिकाणी दहा दिवशीय "महिला उपासक व समता सैनिक दल" शिबिरांचे आज भव्य उद्घाटन करण्यात आले. हे शिबिर शिलरत्न बुद्ध विहार फेकरी, खडका, निंभोरा, कपिल नगर, फुलगाव, पंचशीलनगर भुसावळ, अकलुद आदी ठिकाणी आयोजित करण्यात आले आहेत. या शिबिरांचा मुख्य उद्देश महिलांना बौद्ध धम्माची शिकवण, समता सैनिक दलाची शिस्त आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची जाणीव करून देणे हा आहे.

उद्घाटन समारंभात महिला जिल्हा अध्यक्ष प्रियंका अहिरे, जिल्हा सरचिटणीस वैशाली सरदार, जिल्हा अध्यक्ष सुमंगल तथा रविंद्र अहिरे , राज्य संघटक लताताई तायडे आणि  संस्कार विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष सुमित्रा सर्वटक यांनी प्रमुख पाहुणे म्हणून शिबिरांचे उद्घाटन केले. 

यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हा उपाध्यक्ष समता सैनिक दल मेजर रमेश साळवे, जिल्हा सचिव समता सैनिक दल वनिता साळवे, जिल्हा संघटक वनमाला हिवाळे, जिल्हा उपाध्यक्ष समता सैनिक दल करूणा नरवाडे, भुसावळ शहर महिला अध्यक्ष प्रतिभा सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष प्रचार व पर्यटन प्रकाश सरदार, केंद्रीय शिक्षिका सीमा अहिरे, जिल्हा सचिव वसंतदादा लोखंडे, जामनेर तालुका कार्यालयीन सचिव मुकुंद सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

शिबिरांच्या सुरुवातीला महामानव भगवान गौतम बुद्ध आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी त्रिशरण व पंचशील घेतले. मान्यवरांनी शिबिरातील सहभागींना धम्म मार्गदर्शन केले. शिबिरांमध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती, ज्यामुळे धम्म प्रचाराला आणखी बळ मिळाले.

या सर्व शिबिरांचा सांगता समारोप दिनांक २६ डिसेंबर २०२५ रोजी शुक्रवारी "त्रिरत्न बुद्ध विहार, निंभोरा (दीपनगर)" येथे प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत  "जिल्हा महिला धम्म परिषद" घेऊन करण्यात येणार आहे. जिल्हा सरचिटणीस वैशाली सरदार यांनी जिल्ह्यातील सर्व महिलांना या धम्म परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

शिबिरांच्या यशस्वी आयोजनासाठी चंदा खंडारे, वैशाली जाधव, वनमाला हिवाळे, करुणा नरवाडे, वनिता साळवे, प्रतिभा सोनवणे , प्राज्ञ मेश्राम, ऊषा सुरवाडे, शीला साळवे, निशा वाघ, मंजुळा इंगळे, बनाबाई इंगळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापित केलेल्या भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आणि समता सैनिक दलाच्या शिस्तबद्ध कार्यातून "चलो बुद्ध की ओर" ही घोषणा प्रत्यक्षात उतरत असून, भुसावळ परिसरात धम्माचा प्रचार व प्रसार जोमाने होत आहे. या शिबिरांमुळे महिलांना धम्माची प्रशिक्षण मिळून समता, करुणा आणि मैत्रीच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.